स्वराज्य स्थापनेची सुरुवात कशी झाली |छत्रपती शिवाजी महाराज.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी घेतली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा|आई जिजामाता यांचे स्वराज्य हे स्वप्न होते, परंतु शिवाजीराजांचे वडील शहाजीराजे हे विजापूरचे सरदार होते, परंतु सुलतानांच्या वतनदारीवर काम करणे शिवरायांना अजिबात आवडत नव्हते, त्यामुळे स्वतःचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न ते लहानपणापासूनच बघत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती Information of Chatrapati Shivaji Maharaj in marathi 16 feb 1630

छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य स्थापना

पुणे येथील नैऋत्य दिशेला अत्यंत रमणीय व निसर्गरम्य रायरेश्वरांचे मंदिर होते. एके दिवशी त्या मंदिरात १६४५  साली शिवराय व त्यांचे त्या भागातील बालपणीचे मावळे मंडळी एकत्र जमले होते. तेथील घनदाट जंगल असलेल्या झाडाझुडपांनी वेढलेल्या रायरेश्वराच्या मंदिरात शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांमध्ये स्वराज्याबद्दल मसलत/निर्णय झाला.

https://t.me/marathiblogupdate

स्वराज्य स्थापना

छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा वयाने खूप लहान होते परंतु त्यांच्या विचारांची भरारी ही खूप मोठी होती. त्यांनी त्यांच्या मावळ्यासोबत स्वराज्याबद्दल एक मोठा निर्णय घेण्याचे ठरवले. आणि म्हणाले “गड्यांनो मी तुम्हाला आज माझ्या मनातली एक गोष्ट सांगू का? आमचे वडील शहाजीराजे हे विजापूरचे सरदार आहेत, व त्यासोबतच येथील जहागिरीचा त्यांनी आम्हाला दिला आहे. हे सर्व ठीक आहे पण माझ्या सवंगड्यांना मला यात काही मुळीच आनंद वाटत नाही आहे. सुलतानांच्या वतनदारीवर काम करणे मला योग्य वाटत नाही आहे? आणि त्यांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट का राहावे? दुसऱ्यांच्या ओंजळीने आपण पाणी प्यावे का? असे शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांना म्हणाले.

येथील चारही बाजूने अनेक परकीय राजवटी आहेत. आणि त्यांच्यामध्ये अनेक युद्धेही होतात, परंतु त्यामध्ये आपली माणसे नाहक प्राण गमावतात. आपले अनेक कुटुंबे देशोधडीला लागतात. तेवढे सगळं करूनही आपल्याला काय मिळते शेवटी गुलामगिरीच ना! हे सर्व आपण का सहन करायचे? का आपण त्यांची गुलामगिरी करायची? आपण किती त्यांच्यासाठी खपायचे? सांगा आता तुम्हीच सांगा! म्हणजे वतनाच्या लोभाने आपण असेच सुरू ठेवायचे का? तसेच शिवाजी महाराज त्यांच्या मावळ्यांना विचारत होते.

हे सर्व शिवाजी महाराज अत्यंत रागाने बोलत होते. त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. आणि शेवटी ते बोलता बोलता एकदम शांत झाले. आणि हे सर्व बोलताना शिवाजी महाराजांचे मावळे त्यांच्याकडे गांभीर्याने बघत होते आणि ऐकत होते. ते मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले होते. आणि लगेच एक जण म्हणाला ” बोला राजे बोला, तुमचे मनोदय काय आहे ते आम्हाला सांगा, तुम्ही सांगाल ते आम्ही करण्यासाठी एका पायावर तयार आहोत” “हो राजे तुम्ही जे सांगाल ते, आम्ही करण्यासाठी तयार आहोत! त्यासाठी आम्ही आमच्या प्राण्याची आहुती ही द्यायला तयार आहे!” असे ते सर्व तेजस्वी तरुण एका आवाजात बोलू लागले.

स्वराज्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराज

पुणे येथील त्या घनदाट जंगल असलेल्या झाडाझुडपांनी वेढलेल्या रायरेश्वराच्या मंदिरात शिवाजी महाराजांचे सर्व मावळे एका आवाजात स्वराज्यासाठी प्राणाची आहुती द्यायला तयार झाले. शिवाजी महाराज तुम्ही सांगाल तसे आम्ही करू. त्या आवाजाने शिवाजी महाराज यांना स्फुरण चढले. आणि एकमेकांकडे बघत ते म्हणाले गड्यांनो! आता आपले ठरले, आता आपला मार्ग एकच. आपल्या ध्येयासाठी आपण झटायचे, वेळ पडली तर प्राण्याची आहूती  सुद्धा देऊ. आणि आता आपले एकच ध्येय ते म्हणजे “हिंदवी स्वराज्य” तुमचे ,माझे आणि साऱ्यांचे स्वतःचे स्वराज्य स्थापन करायचे. बस झाली आता परक्यांची गुलामी. आता आपण आपले स्वराज्य निर्माण करून. असे सर्व मोठमोठ्याने एका आवाजात म्हणाले.

मग काय छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे तरुण तेजस्वी मावळे तयार झाले. आणि त्यांचे ध्येय एकच ते म्हणजे हिंदवी स्वराज्य. रायरेश्वराच्या मंदिरात त्यांनी रायरेश्वराला साक्ष ठेवून प्रतिज्ञा केली. स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार अशी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात प्रतिज्ञा केली. त्यांच्या या प्रतिज्ञाने रायरेश्वराचे मंदिर त्यांच्या शब्दांनी घुमू लागले. “हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा” ” हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे श्रीच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण  पूर्ण करूया”असे शिवाजी महाराज निश्चयाने बोलत होते.

स्वराज्याचे हे स्वप्न घेऊन सर्व मावळे रायरेश्वराच्या मंदिरातून बाहेर पडले. हे सर्व बघून शिवरायांचे मन उचंबळून आले होते. नंतर ते पुणे येथील लाल महालात मातोश्रींकडे गेले. व रायरेश्वराच्या मंदिरातील घडलेला सर्व प्रसंग जिजाबाईंना सांगितला. ते ऐकून जिजाबाईंचे मन धन्य झाले. त्यांच्या मनात असलेले स्वराज्याचे स्वप्न आता पूर्ण होणार, व ते शिवाजी महाराज पूर्ण करतील असा त्यांना विश्वास वाटू लागला.

स्वराज्य प्राप्तीसाठी ची सुरुवात

स्वराज्य स्थापनेचा निश्चय मनी बाळगून शिवराय कामाला लागले. तेथील मावळ खोऱ्यातील मावळे जमवाजमव सुरू झाली. मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे प्रशिक्षण घेऊ लागले, त्यांनी मावळ्यांसोबत घोडदौड सुरू केली, खोऱ्यातील मावळ्यांसोबत त्यांनी आडमार्ग शोधणे, खोऱ्यातील खिंडी ,वाटा तसेच चोरवाटा शोधणे, असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. शिवरायांनी त्या तरुण मावळ्यांची अंतकरणे जिंकली होती. शिवरायांसोबतच ते युद्धाचे शिक्षण घेत होते,  स्वराज्य स्थापनेसाठी सर्व मावळे वेडे झाले होते. “जगायचे तर शिवरायांसाठी आणि मरायचे तर शिवरायांसाठीच”असे ते मानू लागले. हे सर्व पाहून शिवरायांच्या हालचालींना उधाण आले.

शिवराय त्यांच्या तरुण मावळ्यांसोबत पुण्याभोवताली असलेल्या सर्व गड किल्ल्यांना बारीक नजरेने न्याहाळू लागले. त्या किल्ल्याभोवतांचे भुयारी मार्ग, आडवाटा, चोरवाटा तसेच किल्ल्याभोवतांचे तळघरे, दारूगोळा, शत्रूंची हत्यारे व शत्रूंच्या फौज्यांची ठिकाणी यांची खडानखडा माहिती मिळवणे सुरू झाले. शिवरायांचे सैन्य कमी असल्यामुळे त्यांनी या सर्व गोष्टी चातुर्याने माहिती करून घेतल्या.

शिवरायांचे सर्व तरुण मावळे हे त्या खोऱ्यातील जन्मलेले, तेथेच वाढलेले, गुराढोरांना चालणारे असल्यामुळे त्यांना तेथील आडमार्ग ,चोरवाटा अशा सर्व गोष्टींची माहिती होती. शत्रू बलाढ्य असल्यामुळे व त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सैन्य असल्यामुळे त्याला सामोरे जाऊन लढणे अशक्य असल्यामुळे शिवाजी महाराजांना शक्तीपेक्षा युक्तीने लढणे योग्य वाटले.

त्या काळात बारा मावळातील काही ठिकाणी देशमुख मंडळी त्यांना दिलेली वतने सांभाळण्यात व्यस्त होती. त्यांना त्या वतनांचा खूप लोभ होता. त्या वतनासाठी ते एकमेकांत नेहमी भांडत असत. आपापसात भांडल्यामुळे मराठ्यांची शक्ती उगाचच वाया जात होती, हे शिवाजी महाराजांना दिसून आले, हे कुठेतरी थांबायला हवं असं शिवाजी महाराजांना वाटत असे. त्यामुळे ते देशमुखांच्या गावांना भेटी देत असत व त्यांना समजावून सांगत. स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाबद्दल त्यांना सांगत असत. अनेकांना शिवरायांचे विचार पटले व काहींनी दांडगाही सुद्धा केली, त्यांना शिवरायांनी वठणीवर आणले. मराठ्यांचे आपापसातील भांडणे त्यांनी थांबवले. त्यामुळे जो तो शिवरायांना धन्यवाद देऊ लागले.

मावळ खोऱ्यातील झुंजारराव मरळ, विठोजी शितोळे, पायगुडे, हैबतराव शिळमकर, बाजी पासलकर व बांदल इत्यादी देशमुख शिवरायांचे शब्द मानू लागले, स्वराज्याचे स्वप्न त्यांनाही पटू लागले. त्यामुळे स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. तिथूनच स्वराज्य स्थापन होण्याची सुरुवात झाली. व शिवरायांच्या जहागिरीचा राजकारभार सुरू झाला. शिवरायांचे वडील शहाजीराजे यांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली.

शिवरायांचे राजमुद्रा

शिवरायांच्या स्वतंत्र स्वराज्यासाठी शहाजीराजांनी शिवमुद्रा तयार केली.

शिवमुद्रा
प्रतीपच्चंद्रेलेखेव वर्धिष्णुवि॔श्ववंदीता ||
शाहसुनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ||

शिवरायांच्या राजमुद्रेचा अर्थ म्हणजे प्रतिपदेच्या चंद्रकलेने वाढत जाणारी साऱ्या जगाला वंद्य़ होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजी राजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे. असे सांगणारी ते राजमुद्रा म्हणजे स्वराज्य स्थापनेचा संकेतच. शिवरायांची हे राजमुद्रा संस्कृत भाषेत कोरली गेलेली होती. जसे स्वराज्य हवे आहेत तसेच राजमुद्रा सुद्धा स्वभाषेचीच असावी. तसेच विश्व धर्माची असावे परंतु दुसऱ्या धर्माचा द्वेषही नसावा अशी ती राजमुद्रा होती. शिवरायांनी सुरू केलेला कारभार हा लोक कल्याणासाठीच आहे. असे साऱ्या मावळ्यांच्या लक्षात आले.

अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेले स्वराज्य हे लोकांच्या कल्याणासाठी होते व मा जिजाऊ यांचे स्वप्न शिवरायांनी पूर्ण केले. या शिवरायांच्या स्वराज्यात सर्व जनता सुखाने व शांततेने नांदू लागली. परक्यांच्या गुलामगिरीतून शिवरायांनी जनतेला मुक्त केले. असे आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांना त्रिवार मानाचा मुजरा.

धन्यवाद… वरील दिलेली माहिती ही स्वराज्य स्थापनेची आहे, माहिती काही प्रमाणात ऑनलाइन दिलेल्या माहितीनुसार आहे तरी काय शंका असल्यास करून सांगा व यामध्ये काही चुकीची माहिती आढळल्यास आम्हाला सांगा आणि ती नक्की दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. आवडल्यास नक्की इतरांना शेअर करा.